- ऑनलाइन लोकमत
उड्डाणपुलाच्या विषयावरुन जळगावचे ए.टी.पाटील संतापले
जळगाव, दि. 13 - सर्व जळगाव खाऊन गेले आणि महापालिकेवाले माझ्यावर कुत्र्यासारखे भुंकतात. मीच शिवाजीनगर पुलासाठी पाठपुरावा करतोय, असे टिकास्त्र खासदार ए.टी.पाटील यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा स्पष्ट उल्लेख न करता सोडले. तर हॉकर्सच्या स्थलांतराचा प्रश्न पालिका प्रशासन चिघळवित आहे. कुणाकडून तरी सुपारी घेऊन हा प्रकार केला जात आहे, अशी तीव्र नाराजी आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केली. खासदार पाटील व आमदार भोळे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या सभेत संताप व्यक्त करीत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.
या सभेला व्यासपीठावर खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे, मध्य रेल्वेचे डीआरएम सुधीरकुमार गुप्ता, जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, सीईओ आस्तिककुमार पांडेय, महापालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे होते. तर आमदारांपैकी फक्त सुरेश भोळे, हरिभाऊ जावळे, स्मिता वाघ उपस्थित राहील्या. आमदार किशोर पाटील हे सभेच्या अंतिम टप्प्यात दाखल झाले.
मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे,डॉ.सतीश पाटील, चंद्रकांत सोनवणे, संजय सावकारे, उन्मेष पाटील, डॉ.गुरूमुख जगवानी, शिरीष चौधरी हे अनुपस्थित राहीले.
काय म्हणाले खासदार ए.टी. पाटील?
जळगाव खाऊन गेले आणि महापालिकेवाले माझ्यावर कुत्र्यासारखे भुंकतात... पण अधिवेशन आले की शिवाजीनगर उड्डाणपुलाचा विषय घेऊन माझ्याकडे येतात...काय आयुक्त साहेब (व्यासपीठावर महापालिका आयुक्तांकडे पाहून)...त्यांना काय माहित मी पुलासाठी काय पाठपुरावा केला...या पुलासाठी सहा कोटी रुपये महापालिकेला द्यायचे आहेत... महापालिका जेवढे पैसे देईल तेवढे... उर्वरित पैसे द्यायला रेल्वे तयार आहे...गडकरी साहेबांनीदेखील हा पूल राष्ट्रीय महामार्गाच्या निधीतून करून देण्याचे सांगितले आहे.... (नंतर हा विषय बंद झाला).