मुंबई : राज्यात पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिकसह होणाऱ्या १८ महापालिकांच्या निवडणुका एकल प्रभाग/वॉर्ड रचनेनुसारच होतील, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यानुसार वॉर्डरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे ही रचना करण्यात येणार आहे. मुंबईत पूर्वीही एकल प्रभाग/वॉर्ड पद्धत होती. मात्र, अन्य महापालिकांमध्ये दोन, तीन किंवा चार वॉर्डांचा एक प्रभाग करून निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती आणि या रचनेचा फायदा भाजपला होईल, असा अंदाज बांधून ती रचना करण्यात आली होती.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एकल प्रभाग/वॉर्ड रचनेच्या आधारे पालिका निवडणुका घेण्याचे ठरले. अधिनियमात तशी सुधारणादेखील केली. थेट नगराध्यक्ष व सरपंच निवडणुका फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आल्या. तो निर्णयही महाविकास आघाडी सरकारने बदलला व निर्वाचित सदस्यांमधून नगराध्यक्ष, सरपंचांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता.
पुढील वर्षी या शहरांमध्ये महापालिका निवडणुकामुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर.