पुणे : महापालिकेने यंदापासून नामदार गोपाळकृष्ण गोखले संसदपटू पुरस्कार सुरू केला असून, पहिल्याच पुरस्कार वितरणासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित करण्याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. पालिकेच्या रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरणही त्यांच्याच हस्ते करण्यात येणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल त्यांचाही गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.महापौर प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पक्षनेत्यांच्या झालेल्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला. संसदपटू पुरस्काराची निवड करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली पालिकेचे सर्व पदाधिकारी, गटनेते तसेच माजी आमदार उल्हास पवार व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची समिती नियुक्त करण्यात आली. रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा तयार आहे. त्याचे अनावरण व पवार यांचा गौरव अशा तिन्ही कार्यक्रमांसाठी राष्ट्रपतींना बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला.(प्रतिनिधी)>१९ फेब्रुवारीला शिवजयंतीसाठी ढोल-ताशा सराव वर्ग, चित्ररथांसह मिरवणूक याला लागणाऱ्या खर्चाची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोथरूड येथील पालिकेने बांधलेल्या सेव्हन डी थिएटरचे उद््घाटन मनसेचे संपर्कनेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते करणे व पालिकेच्या अन्य अनेक विकासकामांची उद््घाटने स्थानिक नगरसेवकांच्या प्रस्तावानुसार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महापौरांनी दिली.
महापालिका राष्ट्रपतींना बोलावणार
By admin | Published: January 07, 2017 1:03 AM