ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. ११ - माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. नामदेव कोठाळेला असं या अधिका-याचं नाव असून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ही अटकेची कारवाई केली आहे. सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे.
सीबीआयने नामदेव कोठाळेला यांना सोमवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशी केल्यानंतर सीबीआयने अटकेची कारवाई केली आहे. महत्वाचं म्हणजे नामदेव कोठाळेला हा हत्या प्रकरणी अटकेत असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांच्यासोबत कार्यरत होता.
शेट्टी यांची जानेवारी २०१० मध्ये पुणे येथे हत्या झाली़ होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सतीश शेट्टी हत्या प्रकरणात याअगोदर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना अटक करण्यात आलेली आहे. सध्या ते पोलीस कोठडीत असून न्यायालयाने 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.