ऑनलाइन लोकमतपुणे, दि. ८ : हात बांधून विहीरीमध्ये फेकून तरुणाच्या करण्यात आलेल्या खुनाचा छडा लावण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे खून झालेल्या तरुणाच्या खिशामध्ये आढळून आलेल्या पीएमपी पासवरुन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्याच्या नावाने फेसबुकवरील अकाऊंट शोधून पोलीस आरोपींपर्यंत पोचले.
सनी कुमार रॉय (वय 22, रा. हडपसर, मुळ रा. भरथराम, लोहाणा, वाराणसी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अल्ताफ आयनोल अन्सारी (वय 22, रा. सुवर्णमंदिर मंगल कार्यालयासमोर, मोहम्मदवाडी), सागर लक्ष्मण ढवळे (वय 25, रा. गुरुदत्त कॉलनी, हरपळे वस्ती, फुरसुंगी), सलमान उस्मान शेख (वय 19, रा. एकता कॉलनी, हडपसर), प्रांजल ऊर्फ सोन्या शिवाजी भोसले (वय 19, रा. काळेपडळ, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी अल्ताफ आणि सनी वॉटर प्रुफिंगची कामे करुन एकत्रच रहात होते. सनी याला बचतीची सवय असून तो बँकेमध्ये पैसे ठेवत असल्याची माहिती आरोपींना होती.
आरोपींना पैशांची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी सनीला मांजरी येथील स्टड फार्मच्या पाठीमागील बाजुस नेले. त्याला मारहाण करीत त्याचे एटीएम कार्ड आणि मोबाईल काढून घेतला. तसेच एटीएमचा पिन क्रमांक विचारुन घेतला. त्यानंतर हात बांधून शेवाळवाडी येथील पडीक शेतजमिनीतील विहीरीमध्ये टाकून त्याचा खून केला होता.
ही घटना 30 जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली होती. पोलिसांना पंचनाम्यादरम्यान सनीच्या पँटच्या चोर खिशामध्ये पीएमपी बसचा पास आढळून आला होता. त्यावर सनी कुमार रॉय असे नाव होते. पोलिसांनी त्याची माहिती मिळवण्यासाठी फेसबुकवर सनी रॉय नावाची सर्व फेसबुक अकाऊंट आणि त्या अकाऊंटवरील मित्र आणि ग्रुप यांचा बारकाईने अभ्यास केला. घटनास्थळावर सनीच्या मृतदेहावरच्या शर्टासमान असलेला शर्ट घातलेला एक फोटो त्याच्या अकाऊंटला मिळाला. त्या अकाऊंटवरील मित्रांचा शोध घेऊन पोलीस हडपसरच्या त्याच्या घरापर्यंत पोचले. तो मागील पाच वर्षांपासून पुण्यात रहात होता. त्याच्यासोबत काम करणा-यांकडे चौकशी करीत असताना आरोपींची नावे पोलिसांना निष्पन्न झाली.
त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आली. या तपासात पीएमपीचा पास आणि फेसबुक हे महत्वाचे दुवे ठरले. ही कारवाई अतिरीक्त आयुक्त (उत्तर विभाग) शशीकांत शिंदे, परिमंडल चारच्या उपायुक्त कल्पना बारवकर, सहायक आयुक्त रविंद्र रसाळ, वरिष्ठ निरीक्षक विष्णू पवार, निरीक्षक दत्ता चव्हाण, अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप देशमाने, हेमंत पाटील यांच्या पथकाने केली.