मुंबई : राज्यातील खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि दंगलीसारख्या गुन्ह्यात लक्षणीय घट झाली आहे. नोव्हेंबर २०१४ ते जून २०१६ च्या आकडेवारीनुसार राज्यातील पोलिसांच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत असून गुन्हे उघडकीस येण्याच्या प्रमाणातही वाढ झाली असल्याचे आज राज्य शासनातर्फे सांगण्यात आले. मार्च २०१३ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत झालेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणापेक्षा २०१२ नोव्हेंबर ते जून १६ या कालावधीत झालेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. खून ६.३९, दरोडा १७.३७ जबरी चोरी ११.७४ घरफोडी ११.४५, दंगलीसारख्या गुन्ह्यात ४.३५ टक्के घट झाली आहे.राज्यातील पोलीस जनतेला मित्र वाटले पाहिजेत यासाठी पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या, त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असून अनेक गुन्हे घडण्यापूर्वीच त्याची सूचना पोलिसांना मिळत आहे. तसेच पोलिसांनी गस्तीत वाढ केल्याने रात्रीच्या वेळी चालणाऱ्या अवैध धंद्यांत घट झाली आहे.पोलीसमित्रसारखे उपयुक्त अॅप ९१ हजार जणांनी आपल्या मोबाइलवर डाऊनलोड केले आहे तर महिलांच्या सुरक्षेसाठी खास तयार करण्यात आलेल्या प्रतिसाद अॅपला ४१ हजार जणांनी प्रतिसाद दिला आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्राची वाढ होण्यासाठी कायदा व सुव्यवस्था टिकविण्याकडे विशेष लक्ष दिले असून पर्यटनस्थळी विशेष सुरक्षा पुरविण्यात आली आहे. त्याचबरोबर अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याने गुन्ह्यांमध्ये घट दिसून येत आहे. (विशेष प्रतिनिधी)
खून, दरोडा, चोऱ्या, दंगलींमध्ये घट
By admin | Published: September 03, 2016 2:01 AM