अहमदनगर : पोलिसांच्या मारहाणीतच संशयित आरोपी असलेल्या दलित तरुणाचा कोठडीत मृत्यू झाल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहे. सीआयडीने दिलेल्या फिर्यादीनंतर सोमवारी आधीच निलंबित करण्यात आलेले दोन पोलीस अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.कोतवाली पोलिसांनी २७ मे २०१५ रोजी नितीन साठे यास संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. त्यानंतर तो पोलीस कोठडीतून नग्नावस्थेत पळाला होता. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले होते. त्यानंतर कोठडीत झालेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. नितीनच्या मृत्यूप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले, पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निमसे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप शिंदे व सादिक शेख, पोलीस नाईक हेमंत खंडागळे व संजय डाळिंबकर यांना निलंबित करण्यात आले होते. नितीनच्या मृत्यूचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपास केला. सीआयडीने तब्बल शंभराच्यावर लोकांचे जबाब घेतले.नितीन कोठडीतून पळाला तेव्हा त्याच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुणा नव्हत्या. पोलिसांनी त्याला पकडून कोठडीत ठेवल्यानंतर मारहाण केली. कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, शवविच्छेदन अहवाल आणि गोपनीय तपासाच्या आधारे सीआयडीने तपास केला. पोलिसांना अटक होणारखुनाचा गुन्हा दाखल झाल्याने सहा पोलिसांना लवकरच अटक करण्यात येईल. वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच कारवाई केली जाईल, असे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी सांगितले.
नगरमध्ये सहा पोलिसांवर खुनाचा गुन्हा
By admin | Published: July 14, 2015 12:53 AM