ऑनलाइन लोकमत
मलकापूर (बुलडाणा), दि. 05 - प्रेम प्रकरणातून १३ दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या २१ वर्षीय नवविवाहितेचा बुधवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरी कु-हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील निमखेड गावात घडली. सदर खून हा नवविवाहितेच्या वडिलांनीच केला असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.
निमखेड येथील गणेश गजानन हिंगणे (वय २७) व मनिषा बाळु हिवरे (वय २१) या प्रेमीयुगलाने गत २६ मार्च रोजी मंदिरात प्रेमविवाह केला होता. या विवाहास मुलीच्या कुटुंबियांतून विरोध असल्याचेही बोलले जात आहे. विवाहानंतर गणेश हिंगणे व पत्नी मनिषा हिंगणे ६ ते ७ दिवस मलकापूर येथे राहिल्यानंतर ६-७ दिवसांपासून निमखेड येथे पतीच्या स्वत:च्या घरी वास्तव्यास होते.
दरम्यान, बुधवारी दुपारी गणेश हिंगणे हा कामानिमित्त बुलडाणा तर त्याचे वडील गजानन हिंगणे हे दाताळा येथे बँकेत गेले होते. तर गणेशची आई कापूस वेचणी करिता शेतात गेलेली असल्याने मनिषा घरी एकटीच होती. नेमक्या याचवेळी तिचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी गणेश हिंगणेसह त्याचे कुटुंबीय सदर खून मुलीचे वडील बाळु हिवरे यांनीच केला असल्याचा आरोप केला आहे. तर तरुणीचे वडिल बाळू हिवरे हे सुध्दा तक्रार देण्यासाठी बोराखेडी पोलीस स्टेशनला हजर झाले असल्याचे कळते.
गणेश व मनिषा हे दोघेही निमखेड येथे एकमेकांच्या घराजवळच वास्तव्यास होते. या जवळीकतेतूनच त्यांचे प्रेम जुळले व त्याचे रुपांतर प्रेमविवाहात झाले. बुधवारी घटनेनंतर गणेशला पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्याच्या हातावरील मेहंदीचा रंगही स्पष्टपणे दिसून येत होता. हा रंग जाण्याआधीच त्यांच्या संसाराचा मात्र बेरंग झाल्याची घटना घडली.