संजय करडे,
मुरुड-जंजिरा- मुरूड तालुक्यात लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत. इच्छुकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरुड तालुक्यात शिवसेनेला या निवडणुकीत प्रचंड मेहनत लागेल, अशी चिन्हे आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या मुरुड नगरपरिषदेवर शिवसेनेने एक हाती सत्ता घेतली असली, तरी ग्रामीण भागात मात्र नवीन मतदाते शोधणे व त्यांचा विश्वास संपादन करणे हा खूप महत्त्वाचा विषय ठरणार आहे. मुरु ड नगरपरिषदेप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाची आघाडी होणार हे आता जवळ जवळ स्पष्ट होत आहे. त्यामुळे तीन पक्ष एकत्र, तर शिवसेना अशी लढाई येथे पाहावयास मिळणार आहे.भाजपा या निवडणुकीतही स्वतंत्र लढणार हे स्पष्ट दिसत असून याबाबतचे संकेत रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश म्हात्रे यांनी दिले आहेत. मुरु ड तालुक्यात पंचायत समितीचे चार गण असून, दोन जिल्हा परिषद सदस्य निवडून जाणार आहेत. मागील वेळी मुरूड पंचायत समितीवर कोणत्याही पक्षाला संपूर्ण बहुमत गाठता आले नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस पक्षास एक एक सदस्य निवडून आले होते. तर जिल्हा परिषद सदस्यमध्ये राजपुरी गणातून राष्ट्रवादीचे सुबोध महाडिक, तर उसरोळी गणामधून शिवसेना पुरस्कृत गोविंद वाघमारे हे निवडून आले होते. मुरु ड तालुक्यात २४ ग्रामपंचायती असून सर्व पक्षांचे अल्पश: वर्चस्व सर्वच भागातून दिसून येते. शिवसेना स्वतंत्र लढली तरी ग्रामीण भागातून मते मिळवण्यासाठी जोरदार मेहनत करावी लागणार आहे. तर आघाडीलासुद्धा आपापले मतदार सुरक्षित व असणारे प्राबल्य मतदान होईपर्यंत सुरक्षित राखणे हे सुद्धा कठीण आव्हानात्मक आहे. >उमेदवारांचे नाव जाहीर नाहीचराजपुरी गणातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुबोध महाडिक हे अलिप्त असून ते कोणती भूमिका घेणार याकडेसुद्धा सर्वच पक्षांचे लक्ष वेधले आहे. पंचायत समिती गणामधून काही पुरु ष मंडळी निवडून आली होती तिथे आता महिला आरक्षण पडल्याने कोणाची वर्णी लावावयाची हासुद्धा प्रत्येक पक्षापुढे यक्षप्रश्न सतावत आहेत. लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे. सद्या उमेदवारांच्या नावाच्या चाचपण्या सुरु असून कोणाचेही नाव अधिकृत जाहीर करण्यात आलेले नाही. प्रचाराची सुरु वातसुद्धा झालेली नसून फक्त व्यक्तिगत गाठीभेटी घेतल्या जात आहेत.