स्नेहा मोरे, मुंबईदिल्लीत नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या इमारतीत मंगळवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे राष्ट्रीय संपत्ती असलेल्या संग्रहालयातील ऐतिहासिक आणि अमूल्य अशा दस्तावेजांचे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीशी लढा देण्यासाठी मुंबईतील महत्त्वाच्या वस्तू संग्रहालयातील अग्निसुरक्षेचा ‘लोकमत’ने आढावा घेतला. त्यात प्रमुख संग्रहालयांतील अग्निसुरक्षा सक्षम असल्याचे दिसून आले. कुलाबा येथील परदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात विविध विषयांवर आधारित १२ हून अधिक कला दालने आहेत. शिवाय या वस्तुसंग्रहालयाने नुकतीच ‘फिरते म्युझियम’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. बसच्या माध्यमातून हे म्युझियम विविध शाळांना आणि संस्थांना भेट देत असते. या म्युझियमच्या गॅलरी विभागाच्या सहायक संचालिका डॉ. मनिषा नेने यांनी संग्रहालयातील अग्निसुरक्षा यंत्रणेबद्दल माहिती देताना सांगितले, ‘आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नेमके काय करायचे, याचे प्रशिक्षण संग्रहालयातील कर्मचाऱ्यांना दिले जाते. शिवाय संग्रहालयाच्या प्रत्येक कलादालनात सक्षम अग्निरोधक यंत्रणा आहे, तसेच सर्व ठिकाणी फायर अलार्म यंत्रणा ही कार्यान्वित आहे. संग्रहालयाची मुख्य इमारत हेरिटेज वास्तू असल्याने, येथील वायरिंग पूर्णपणे बदलण्यात आले आहे. संग्रहालयातील इलेक्ट्रिक सबस्टेशन दक्षतेच्या कारणास्तव संग्रहालयाच्या बाहेर हलवण्यात आले आहे. संग्रहालयातील सर्व इलेक्ट्रिक यंत्रणांची प्रत्येक महिन्याला चाचणी करण्यात येते. त्या तपासणीत काही त्रुटी आढळल्यास त्वरित सुधारणा करण्यावर संग्रहालय व्यवस्थापनाचा भर असतो.भायखळा येथील डॉ. भाऊदाजी लाड वस्तुसंग्रहालय विविध संस्कृतींचे दर्शन घडवणारे कलादालन आहे. शिवाय, या ठिकाणी संग्रहालयाच्या आवारात कला रसिकांसाठी प्रदर्शने, कार्यशाळांचेही आयोजन करण्यात येते. या संग्रहालयाचे सीनियर असिस्टंट क्युरेटर हिमांशु कदम यांनी संग्रहालयाची अग्निसुरक्षा आपत्कालीन परिस्थितीसाठी सक्षम असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘२००८ साली संग्रहालयाच्या रिस्टोरेशन प्रकल्पानंतर अग्निरोधक यंत्रणा अद्ययावत करण्यात आली आहे. त्याच्यानंतर संग्रहालयात मुख्य नियंत्रण यंत्रणा असून, त्या माध्यमातून एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याविषयी ताबडतोब माहिती मिळते. याखेरीज संग्रहालयात पाचहून अधिक आपत्कालीन मार्ग आहेत. तीन महिन्यांनंतर संग्रहालयातील सर्व यंत्रणांची निरीक्षण चाचणी चोखपणे पार पडते आणि त्यानुसार बदल करण्यात येतो.
मुंबईची संग्रहालये अग्निसुरक्षित
By admin | Published: April 28, 2016 6:10 AM