सातारा / वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील सोळशी शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊ इच्छिणाऱ्या धाडसी महिलांनी धर्माचा आदर करत आपली इच्छा पूर्ण करावी, तसेच या घटनेला विरोध करणाऱ्या नंदगिरी महाराजांनीही स्त्रित्वाचा आदर करत देवस्थानचे नाव जपावे, असे आवाहन सातारा जिल्ह्यातील अनेक माता-भगिनींनी मंगळवारी केले. शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर एका तरुणीने प्रवेश केल्यापासून महाराष्ट्रातील समाजमन ढवळून निघालेले असतानाच आता जिल्ह्यातील ‘सोळशीचा शनी’ मंदिरातील चौथऱ्यावर प्रवेश करून दर्शन घेण्याचा निर्धार काही महिला संघटनांनी जाहीर केला आहे. महिलांच्या अशा शनी दर्शनाला आपला कडाडून विरोध असल्याचे संबंधित सोळशीच्या नंदगिरी महाराजांनी जाहीर केले आहे. ‘पुराणातही अनेक ठिकाणी शनी देवाचा महिला वर्गाशी संवाद झाल्याचे अनेक दाखले आहेत. यात कुठेही शनी देवाने माझ्यासमोर महिलांनी येऊ नये, असे म्हटले नाही. मात्र, अलीकडच्या काळात माता-भगिनींना या देवापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला. ती चुकीची परंपरा मोडून काढण्यासाठी जर सातारा जिल्ह्यातील महिला पुढाकार घेत असतील तर तो खचितच जिल्ह्याच्या इतिहासाला साजेसा असाच आहे. मात्र, चौथऱ्यावर जाणाऱ्या महिलांनी धर्मशास्त्राच्या पावित्र्याचा भंग होऊ न देता आपली इच्छा पूर्ण करावी,’ अशा शब्दात सुनीता जाधव, प्रमिला पाटील, शोभा देशपांडे अन् ज्योत्स्ना गुजर यांच्यासह अनेक महिलांनी भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, ‘राज्यघटनेच्या अधिकारानुसार आमच्या मंदिरात येऊ पाहणाऱ्या महिलांनी इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळातही जावे, मग आमच्याकडे यावे,’ असे आवाहन सोळशी येथील शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज यांनी केले आहे. तर या मुद्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्य महिला आयोग संघटनेच्या राज्याध्यक्षा अॅड. वर्षा देशपांडे यांनी स्पष्ट केले की, ‘आम्ही ज्या धर्मात जन्मलो, त्याच धर्माच्या मंदिरात जाणार ना? दुसऱ्या धर्माचा संदर्भ देऊन विषय बदलण्याची काहीही गरज नाही.’’नंदगिरी महाराज यांनी शनी दर्शनाबाबत सखोल विवेचन केले आहे. ते म्हणतात की, ‘प्रत्येक धर्माला ग्रंथाचा आधार असतो, त्याप्रमाणे शनी देवतेबाबत ज्योतीषाचार्य वि. के. फडके यांच्या शनि पिडा पुस्तकात शनिदर्शन कसे घ्यावे, याबाबत दाखला देण्यात आला आहे. यामध्ये शनिदर्शनामुळे आपली शनिपिडा निश्चितपणे दूर होईल, अशी खात्री आहे; पण हे दर्शन घेताना महत्त्वाचा नियम हे लोक विसरतात, हा नियम म्हणजे शनिचे दर्शन कधीही समोरून घेऊ नये, त्याच्या डोळ्याला डोळा भिडवायचा नाही, कारण ‘दृष्टी पडे जयावर होइ तयाचा चकनाचूर’ असे शनिमहात्म्यात स्पष्टपणे सांगितले आहे. या प्रकारेच आचार्य रामानंद सरस्वती लिखित शनि उपासना, डॉ. भोजराज द्विवेदी लिखित भोजसाहित्य, डॉ. ना. कृ. घळसासी लिखित श्री शनीकोष अशा ग्रंथामधून शनीच्या दर्शनाबाबत परखड भूमिका मांडण्यात आल्या आहेत.’ (प्रतिनिधी)
म्युझिकल सांता घालतोय ‘जिंगल बेल’ची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2015 12:31 AM