ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 23 - सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या चौथ्या स्मृतिदिनी गुरुवारी दर्डा उद्यानस्थित ‘शक्तीस्थळ’ येथे संगीतमय श्रद्धांजली सभा पार पडली. यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजयबाबू दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्रबाबू दर्डा, जळगावचे रमेशदादा जैन आदी मान्यवरांनी त्यांना पुष्पअर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुवारी ( २३ मार्च) सायंकाळी ६.३० वाजता दर्डा उद्यानच्या हिरवळीवर स्वरांजलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शास्त्रीय गायिका अंकिता जोशी आणि बासरीवादक एस. आकाश यांची प्रभावी सुरावट आणि स्वर-सुरांची मिलावट ही जुगलबंदी दैवी आनंद देणारी ठरणार आहे.
एस. आकाश हा उमदा कलावंत हिंदुस्थानी वाद्यसंगीताच्या दुनियेचा सरताज आहे. हैदराबाद येथील पंडित मोतीराम, पंडित मणिराम संगीत समारोह त्यांनी गाजविला आहे. विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. भारतरत्न डॉ. एम.एस. सुब्बलक्ष्मी फेलोशीप त्यांना मिळाली आहे.
एसएनडीटी विद्यापीठातून संगीतात पदव्युत्तर झालेल्या अंकिता जोशी यांनी भारताच्या विविध शहरात आणि अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये गायनाचे कार्यक्रम केले आहे. अखिल भारतीय महाविद्यालयीन युथ फेस्टिवलमध्ये त्यांनी अनेकदा बक्षिसे मिळविली. न्यूयॉर्कमध्ये २००९ मध्ये झालेल्या वेदिक हेरिटेज हिंदुस्थानी क्लासिकल कॉम्पिटिशनमध्ये अंकिता द्वितीय ठरल्या आहेत. ‘सारेगामापा’ सारख्या टीव्ही वाहिन्यांवरील विविध कार्यक्रमांमध्येही त्यांनी सादरीकरण केले आहे. यवतमाळकरांनी या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.