कोल्हापूर : कोल्हापूरची अंबाबाई ही कुण्या एका विशिष्ट धर्माची किंवा जातीची देवी कधीच नव्हती. ती सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असल्याची माहिती मोडीलिपीच्या अभ्यासातून पुढे आली आहे. देवीच्या चरणी याकूब गजबर शेख, मोहिदिन समशेरदिन जमादार, इम्रान मीरा महात, कादर दाऊल नगारजी हे सेवक म्हणून होते, अशी माहिती तत्कालीन जयराम गणेश चोपदार यांच्या जबानीतून पुढे आली आहे.येथील मोडीलिपीचे अभ्यासक व राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह राजेयादव यांनी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीची मोडी कागदपत्रे (खंड-२) हा ग्रंथ लिहिला आहे. त्यासाठी त्यांनी केलेल्या मोडी कागदपत्रांच्या अभ्यासातून देवीबद्दलची मनोरंजक माहिती पुढे आली आहे. या ग्रंथाचे प्रकाशन येत्या रविवारी (दि. २८) पुण्यात होणाऱ्या अखिल भारतीय मोडीलिपी साहित्य संमेलनात ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सदाशिव शिवदे यांच्या हस्ते होत आहे.या खंडामध्ये गोविंद आणाजी विजापूरकर, नारोबा मेवेकरी, गणू बहिरू मोरे, बाबाजी पोकले, गोपाळा गोविंदा कोमटी, मोहिद्दिन जमादार, वासुदेव पटवेकरी, कृष्णा पाटील आदींच्या करवीर संस्थान ईलाखा आॅफिसरसमोर झालेल्या जबानीचा समावेश आहे. या व्यक्ती करत असलेल्या कामाची माहिती त्यामध्ये आहे. या सर्व कागदपत्रांना निशाणी क्रमांक दिला असल्याने ऐतिहासिक साधनाच्या क्रमवारीत हे प्रथम स्थान क्रमांकाचे कागद आहेत. ही कागदपत्रे सन १७०० ते १८९६ या कालखंडातील असून मंदिर इतिहासातील अनेक अज्ञात दालने खुली होतील, असा विश्वास लेखक राजेयादव यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)कोल्हापुरातील राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनीच्या वतीने मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी, संवर्धनासाठी अखिल भारतीय मोडी लिपी साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या रविवारी (दि. २८) करण्यात आले आहे.
मुस्लीम बांधवही अंबाबाईच्या सेवेत
By admin | Published: February 24, 2016 2:19 AM