ऑनलाइन लोकमतभुसावळ, दि. 18 - मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी जमियत उलमा ए हिंदच्या नेतृत्वात शहर व तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधवांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले.शहरातील खडका रोडवरील रजा टॉवरपासून सकाळी १०़३० वाजता मूक मोर्चाला सुरुवात झाली़ मोर्चेकऱ्यांच्या हातात 'आमचा हक्क आम्हाला द्या' या आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते. सकाळी साडेनऊ वाजेपासून शहर व तालुक्यातील मुस्लीम समाजबांधव रजा टॉवर भागात जमायला सुरुवात झाली.
शिस्तीचे दर्शनरजा टॉवरपासून सुरू झालेल्या मोर्चात शिस्तीचे दर्शन घडले़ रजा टॉवर ते थेट लाल बिल्डींगपर्यंत मोर्चेकऱ्यांची रांग लागली होती़. मोर्चेकरी अतिशय शिस्तबद्धरित्या प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचले तर रस्ता ओलांडणाऱ्या महिलांसह नागरिकांना जागो-जागी जागाही करून देण्यात येत होती.
दिव्यांगांचाही सहभागमुस्लीम समाजाच्या मोर्चात अनेक अंध, अपंग बांधवांचाही लक्षणीय सहभाग राहिला.
मौलवींनी दिले निवेदनसकाळी ११़१५ वाजेच्या सुमारास मोर्चेकरी प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचले़ प्रसंगी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना आठ मौलवींच्या शिष्ट मंडळाने आरक्षणासंदर्भात निवेदन दिले़ त्यात मोर्चा प्रमुख तसेच पापा नगर मशिदीचे मौलाना अब्दुल हकीम कादरी, जमियत उलमा ए हिंदचे अध्यक्ष कायदे मिल्लत मौलाना नूर मोहम्मद इशाती, मौलाना सैय्यद नूर आलम, मौलाना अनिस कासमी, हाफीज कमरुद्दीन साहब, मौलाना जावेद नकवी, मौलाना हाफीज गुलाम सरवर, मौलाना अब्दुल्ला इशाती, मौलाना महेमद पटेल यांचा सहभाग होता.
१५ हजारांवर बांधवमूक मोर्चात सुमारे १५ हजारांवर मुस्लीम बांधव सहभागी झाले होते़ नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, रऊफ खान, जलील कुरेशी, मुन्ना तेली, आशिक खान, ईस्माईल गवळी, शफी पहेलवान, नईम पहेलवान, मुन्वर खान, अफसर खान, आरीफ शेख गनी, साबीर मेंबर यांच्यासह हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले.
चोख बंदोबस्तबाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक मारोती मुळूक, मनोज पवार तसेच शहरचे निरीक्षक वसंत मोरे, तालुक्याचे बाळासाहेब गायधनी, उपनिरीक्षक सचिन खामगड, नशिराबादचे सहा़निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला़ मराठा समाजाचा पाठिंबामुस्लीम समाजबांधवांच्या मूक मोर्चाला मराठा समाजबांधवांनी पाठिंबा दर्शवला तसेच मोर्चेकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली़ प्रसंगी अलका भगत, भैय्या ओगले, गोपाळ राऊत, प्रकाश नाईक, ईश्वर पवार, कृष्णा शिंदे, संजय कदम, के़एम़वाघ, विनोद पाटील आदींची उपस्थिती होती़ यावलसह बोदवडलाही मोर्चाआरक्षणाच्या मागणीसाठी यावलसह बोदवड येथेही मूक मोर्चा काढण्यात आला़ यावल येथील चोपडा रोडवरील इंदिरा गांधी हायस्कूलपासून मंगळवारी सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात झाली़ तहसीलदार कुंदन हिरे यांना पाच महिलांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले तर बोदवड शहरातील आखाडा मोहल्ला भागातून सकाळी १०़३० वाजता मोर्चाला सुरुवात झाली़. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.