मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांत सर्वाधिक जागा मिळवलेल्या भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालेले नाही. अशा वेळी सत्तेवरून पायउतार झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:हून पुढे येत भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. परिणामी, स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात मुस्लीम संघटनांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.सत्तेत राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आत्मघातकी पाऊल असल्याचे मत मुस्लीम संघटनांच्या खुला मंच या संस्थेने व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीने भाजपावर जातीयवादाची टीका करत मतदान न करण्याचा सल्लाही दिला. मात्र आज सत्तेच्या लालसेपोटी राष्ट्रवादी भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका घेत आहे. परिणामी मुस्लीम समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसला मते द्यायची व त्यांनी भाजपाला पाठिंबा द्यायचा, त्यापेक्षा मुस्लीम समाजाने थेट मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला मते देण्यास काय हरकत आहे, असा सवाल मंचाचे निमंत्रक गुलाम पेशिमाम यांनी उपस्थित केला आहे.निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल देत भाजपाने या वेळी केवळ विकासाचा मुद्दा स्वीकारल्याकडे पेशिमाम यांनी लक्ष वेधले. भाजपाला केंद्रापाठोपाठ राज्यातही बहुमत मिळाले. याउलट एआयएमआयएमसारख्या पक्षामुळे समाजाचे नुकसान होणार असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले. देशातील मुस्लीम तरुण धार्मिकतेऐवजी विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करू पाहत आहेत. मात्र काही एआयएमआयएमसारखे पक्ष तरुणांमध्ये रोष पसरवून स्वत:चा स्वार्थ साधू इच्छित असल्याचेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीच्या भूमिकेने मुस्लीम संघटना नाराज
By admin | Published: October 24, 2014 4:11 AM