मुंबई - मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ देशात ठिकठिकाणी भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्याविरोधात मुस्लीम संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल याठिकाणी मुस्लीम संघटना हिंसक झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातही मुस्लीम संघटना याविरोधात रस्तावर उतरून निषेध केला. मात्र पोलिसांनी योग्य खबरदारी घेतल्याने राज्यात कुठेही हिंसक घटना घडली नाही असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) म्हणाले की, भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात आंदोलन होणार असल्याची माहिती कालच मिळाली होती. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आज सोलापूर, औरंगाबाद, जालनासह राज्यातील ठिकठिकाणी मुस्लीम समाजाने शांततेने हे आंदोलन केले. सर्वोच्च श्रद्धास्थानाबद्दल जर कुणी अशाप्रकारे चुकीचे उद्गार काढत असेल तर तो राग येणे स्वभाविक आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच नुपुर शर्मा, नवीन कुमार जिंदाल यांच्याविरोधात महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु केंद्रीय गृहखात्याने याबाबत कारवाई करायला हवी. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडलेला नाही. प्रत्येक घडामोडींवर महासंचालक, आयुक्त लक्ष ठेवून आहेत. पूर्ण खबरदारी राज्यात घेण्यात आली. आवश्यकता वाटल्यास राखीव पोलीस दल सज्ज होते. पोलिसांनी योग्य परिस्थिती हाताळली. मुस्लीम समाजानेही शांततेत आंदोलन केले कुठेही कटुता निर्माण झाली नाही. आपली श्रद्धास्थाने आहे. त्याचा आदर आपण करतो. दुसऱ्याच्या श्रद्धास्थानाचा अनादर करण्याचं काम कुणीही करू नये. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सर्व समाजातील लोकांनी सहकार्य करावे असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदालविरोधात दिल्लीतील जामा मशिदीबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. त्यानंतर हळुहळू हे आंदोलन देशातील अनेक राज्यात पसरत गेले. महाराष्ट्रातही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रातील संवेदनशील अशा औरंगाबाद, परभणी, सोलापूर, जालन्यात हजारोंच्यां संख्येने मुस्लिम लोक रस्त्यावर आले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या शहरांसह तिकडे, नवी मुंबई आणि पनवेलमध्येही शेकडो-हजारो लोक रस्त्यावर आलें. सोलापूरमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेसाठी एमआयएम पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तर, औरंगाबादमध्येही शेकडोंच्या संख्येने जमाव विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. यावेळी खासदार इम्तिजाय जलील यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले.