- तेजस टवलारकरसंत तुकोबाराय वारी करत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शेकडो वारकरी जात होते. वाटेत एकदा असाच पाऊस आला. काय करावे कळत नव्हते. शेजारीच मशीद होती. मुस्लीम बांधवानी ती मशिद खुली करून वारकऱ्यांना आश्रय दिला. वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण केले. त्यावेळी जगदगुरू संत तुकोबारायांनी रात्री किर्तन केले. त्यात अल्ला देवे अल्ला दिलावे, असा अभंग जागेवर रचला. त्या दिवसापासून वारी सर्व समाजाची झाली. सर्वसमावेशक झाली. तुकोबांपासून घट झालेली एकोप्याची वीण वर्षानुवर्षे, युगानयुगे कायम आहे. संत तुकोबाराय पालखी सोहळा यवत मुक्कमी आला. तेथे एकोप्याची वीण अधिक घट्ट झाल्याचा अनुभव आला. पालखीत वारकऱ्यांना सर्वधर्मीय दाते मिळतात. यवतलाहू मुस्लीम समाज जेवण देतो. आज यवत मुक्कामी सोहळा आला. मात्र एकदशी होती. लोकांचे उपवास होते. यवत गावकरी झुणका भाकर असे पारंपारिक जेवण करतात. मात्र यंदा भगर केली तीही सातशे किलो. मुस्लीम समाजही जेवण करतो. मात्र एकादशी आल्याने मुस्लीम समाजाने चक्क खिचडी केली, तीही शंभर किलो. यवतला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुस्लीम समाजाकडून दर वर्षी जेवण दिले जाते. यावर्षी येथील दर्ग्यामध्ये शंभर किलो साबुदाण्याची खिचडी करण्यात आली होती. मागील अनेक वर्षांपासून धार्मिक सलोख्याची परंपरा जपली जात आहे. ती सलोख्याची वीण अधिक घट्ट होत आहे. यवतमधील मुस्लीम समाजाचे तरूण वारकऱ्यांच्या सेवेसाठी दरवर्षी तत्पर असतात. ग्रामस्थांतर्फे वारकऱ्यांना जेवण दिले जाते. त्यात मुस्लीम समाजही मागे नसतो. येथील दर्ग्यामध्ये मुस्लीम तरूण एकत्र येत वारकऱ्यांसाठी स्वयंपाक करतात. यावर्षी पालखी मुक्कामाच्या दिवशी उपवासाचा दिवस असल्याने या तरूणांनी खिचडीचा बेत आखला होता. शंभर किलो साबुदाण्यापासून येथे खिचडी तयार करण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी हिंदू-मुस्लीम समाजातील एकोप्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. धार्मिक सलोखा वाढवणाऱ्या उपक्रमाचे समाजातून स्वागत झाले. उपक्रमामध्ये समीर सय्यद, रौफ सय्यद, लिकायत शेख, फिरोज मुलाणी, अझमुद्दीन तांबोळी यांच्यासह अनेक तरूण दरवर्षी सहभागी होत असतात. ग्रामस्थ व पालखी सोहळ्याच्या वतीनेही या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
अल्ला देवे अल्ला दिलावे; पालखी सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 10:04 AM