पालघर : मुस्लिम समाजातील तरुणांनी जास्तीत जास्त उच्च शिक्षित होऊन आपली प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी पालघर येथे आयोजित अल्पसंख्याक मेळावा दरम्यान केले.पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी व पालघर तालुका अल्पसंख्य विभागातर्फे पालघर येथे मुस्लिम समाजासाठी मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्या दरम्यान माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यानी आपल्या कार्यकाळात अल्पसंख्याकांच्या शाळासाठी अनेक शालोपयोगी उपक्रम राबविले. त्यामुळे मुस्लिम समाजातील तरुणांनी शिक्षण घेणे ही काळाची गरज बनल्याचे सांगून चांगले शिक्षण घेतल्यास समाज नक्कीच उन्नती करेल असा आशावाद ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शासनाने सच्चर कमिटीच्या शिफारशी लागू कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. मुस्लिम समाजातील काही तरुण जातीयवादी पक्षाकडे जात असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त करून अल्पसंख्याकांना न्याय फक्त कॉग्रेस पक्षचं देऊ शकतो असेही सांगितले. कॉग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माना बरोबर घेउन जाणारा पक्ष आहे. अल्पसंख्य फक्त मुस्लिम नाही तर शिख, इसाई, जैन व इतर ही धर्म त्यात येतात स्वातंत्र्य लढ्यातही या सर्व समाजाने भाग घेत देशाच्या रक्षणासाठी हौतात्म्यही पत्करले असल्याचे प्रदेशचे केदार काळे यांनी सांगितले. अल्पसंख्य जिल्हा अध्यक्ष मुस्तफा मेनन यानी मेळावे घेउन कॉग्रेस पक्षा पासून दूर गेलेल्यांना परत मूळ प्रवाहात आणण्याचा विश्वास व्यक्त केला. तालुका अध्यक्ष सिकंदर शेख, रिफक भुरे, शमीम शेख, अिसफ मेमन, शब्बीर शेख, बाबूभाई खान, मोमेज शेख, हफिज खान, कासिम मुछाले यांनी आपले विचार मांडले.हजर उद्दिन, अरविंद परमार, मनोहर दांडेकर, परवेज शेख, मोहसिन शेख, चंद्रकिशोर चौधरी, तेजींदर सिंग, कमलेश वारय्या, इसराईल खान, पूनमचंद जैन व मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
मुस्लिमांनी उच्च शिक्षित व्हावे - गावित
By admin | Published: November 02, 2016 3:01 AM