अकोला: निवडणुका आल्या की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिमांची आठवण येते आणि अनेक वर्षांपासून काँग्रेस भाजप, सेनेची भीती मुस्लिमांना दाखवून मते पदरात पाडून घेते; परंतु मुस्लिमांचा, त्यांच्या वस्त्यांचा विकास कधीच करीत नाहीत. त्यामुळे काँग्रेसला साथ देणाऱ्या मुस्लिमांनो आता तरी काँग्रेसच्या गुलामगिरीतून बाहेर पडा, असे आवाहन एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सैयद मोईन यांनी येथे केले. जुने शहरातील भाजी बाजारात सोमवारी रात्री जाहीर सभेत ते बोलत होते. महापालिका निवडणूक प्रचाराचा बिगुल एआयएमआयएमने फुंकून प्रचाराच्या रणधुमाळीची सुरुवात केली. जाहीर सभेला एमआयएमचे शहराध्यक्ष जमील खान, सैयद मोहसिन अली, मोहम्मद मुस्तफा पहेलवान, इमरान हबीब खान, चाँद खान आदी होते. सैयद मोईन यांनी, अकोला महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती; परंतु मुस्लीम वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार होत आहेत. काँग्रेसने केवळ धर्मनिरपेक्षतेचे सोंग घेतले आहे. हिंदू वस्त्यांचा काँग्रेसने विकास केला; परंतु मुस्लिमांची मते मिळवून सत्ता हस्तगत केली; परंतु मुस्लीम वस्त्यांचा विकास केला नाही, असा आरोप मोईन यांनी केला. ते म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांना भाजप, सेनेची, ठाकरे, मोदींची भीती दाखवून मुस्लिमांची मते मिळविली, सत्ता उपभोगली. आता सत्ता गेली तर मुस्लिमांचा एवढा कळवळा आला की, मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी काँग्रेस करू लागली. पंधरा वर्ष काँग्रेस सत्तेत असताना, मुस्लिमांना आरक्षण का दिले नाही, असा सवालही सैयद मोईन यांनी केला. काँग्रेसनेसुद्धा मुस्लिमांसोबत भेदभाव केला. मुस्लिमांवर, आमच्या युवकांवर अन्याय, अत्याचार होतात. तेव्हा काँग्रेसचा एकही नेता बोलायला पुढे येत नाही. गुजरातमध्ये दंगल झाली, दादरी कांड झाले; परंतु एकही काँग्रेसी नेता तेथे मुस्लिमांचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही आणि आमच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. पातूर नगर परिषदमध्ये सत्तेसाठी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केली. भाजपसोबत कोण जात आहे, हे मुस्लिमांना ठाऊक आहे. काँग्रेस, भाजप हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुस्लिमांवर कुठेही अन्याय झाला तर एआयएमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी, अकबरूद्दीन ओवेसी धाऊन जातात. एक सक्षम पर्याय म्हणून एआयएमआयएम पुढे येत आहे. त्यामुळे मुस्लिमांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या कुबड्या फेकून दिल्या पाहिजेत, असेही प्रदेशाध्यक्ष सैयद मोईन म्हणाले.