- डिप्पी वांकाणी, मुंबईइसिसमध्ये सामील होण्यासाठी जाणारे वाजेद शेख आणि नूर मोहंमद मध्यातूनच परतले असताना इसिसमध्ये जाण्यासाठी तयार झालेल्या आणखी सात युवकांचे मतपरिवर्तन करण्यात यश आल्याचा दावा महाराष्ट्र एटीएसतर्फे करण्यात आला आहे. या सातपैकी पाच जणांकडे वैध पासपोर्ट होता.हे सात जण सीरियाला जाण्याच्या तयारीत होते; पण वेळीच त्यांची ओळख पटल्याने त्यांचे मतपरिवर्तन करण्यात आम्हाला यश आले. या सात जणांपैकी एक जण केमिकल इंजिनीअर आहे. तो पत्नी आणि मुलांसह इसिसमध्ये सामील होऊ इच्छित होता. त्याच्या पत्नीनेही स्वत:हून इसिसमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे एटीएस अधिकाऱ्याने सांगितले.शनिवारी वाजेद आणि नूर या दोघांची पहिली मुलाखत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली. एटीएसमधील सूत्रांनी सांगितले की, आम्ही या दोघांवर प्रश्नांची सरबत्ती करताच त्यांनी १८ ते २५ या वयोगटातील आणखी सात युवक इसिसमध्ये सामील होण्यासाठी तयार असल्याची माहिती दिली. त्यांनाही अयाज सुलतान आणि मोहसीन शेख यांनी ब्रिटनस्थित आबुबारा आणि जिहादी जॉन यांचे व्हिडीओ दाखवून भडकावले होते, असे वाजेद आणि नूर यांनी सांगितले. वाजेद आणि नूर यांच्याकडे वैध पासपोर्ट नव्हते, त्यामुळे त्यांच्यासाठी चेन्नईतून पासपोर्ट मिळविण्याचा प्रयत्न मोहसीनने चालविला होता.जेव्हा या प्रतिनिधीने वाजेदला अन्य सात युवकांबद्दल विचारले तेव्हा त्याने त्यांच्याबद्दल बरीच माहिती दिली. हे सातही जण एका स्थानिक मशिदीत जात असत आणि तेथे ते इस्लामच्या विविध पैलूंवर चर्चा करीत असत, मात्र यापैकी कोणाशीही आता आपला संपर्क नाही, असा खुलासाही वाजेद याने केला. मिळालेल्या माहितीनुसार, या सातही युवकांची आर्थिक स्थिती चांगली असून, त्यातील काही जण इंजिनीअर आणि व्यापारी आहेत. मात्र स्थानिक समाज-नेत्यांनी आणि एटीएसने त्यांचे तीन महिन्यांत मतपरिवर्तन करण्यात यश मिळविले.इसिसमध्ये जाण्यासाठी युवकांना पैशाचे आमिष दाखविण्यात आले नव्हते. त्यातील काही जण स्वत:च पैसे खर्चून जाण्यास तयार होते, असेही एटीएसतर्फे सांगण्यात आले. या युवकांचे मतपरिवर्तन करून त्यांना पोलीस यंत्रणेच्या जवळ आणण्यात आम्हाला यश आले आहे. यापुढेही आम्ही अशा युवकांचे मतपरिवर्तन घडवून चुकीच्या मार्गाने जाण्यापासून त्यांना रोखणार आहोत, असेही हा अधिकारी म्हणाला. यापूर्वी धुळे येथील सहा युवकांचेही यशस्वीरीत्या मतपरिवर्तन करण्यात आले होते.सर्वाधिक धोका गोव्याला इसिसचा सर्वाधिक धोका गोव्याला असल्याची सूचना येथील यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे गोवा अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. इंडियन मुजाहिद्दीन आणि अल कायदाचा धोका गोव्याला असल्याच्या सूचना राज्यातील आयबीसारख्या गुप्तचर विभागाकडून वारंवार मिळत होत्या. आता इसिसचाही धोका असल्याचे उघड झाले आहे. तशा सूचना मिळाल्याची माहिती राज्याच्या पोलीस मुख्यालयातील सूत्रांनी दिली. इसिसच्या हिट लिस्टमध्ये गोव्याचे नाव सर्वांत वर असल्याचे या सूचनेत स्पष्ट म्हटले आहे. गोवा पोलीस मुख्यालयातील सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ असल्यामुळे परदेशातील लोक येथे मोठ्या संख्येने येतात. पर्यटक लक्ष्यपरदेशी लोकांची जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी घातपात घडविण्याचा इसिसचा कट असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. युरोप, अमेरिका आणि रशियातील पर्यटक जेथे जास्त आहेत, त्या जागा अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर आहेत. अतिरेकी कारवायांच्या संशयावरून अटक केलेल्या काही संशयितांकडून ही माहिती उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
इसिसवेड्यांचे मतपरिवर्तन
By admin | Published: March 27, 2016 1:38 AM