ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 2 - पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती हैं', शीतल किंमतकर यांच्याकडे पाहिल्यानंतर या उक्तीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. मूकबधिर असतानाही या युवतीने पुरुषांची मक्तेदारी असलेल्या जादूगारीच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. जिथे सतत बोलावे लागते तेथे एक शब्दही न उच्चारता केवळ आपल्या कृतीने प्रेक्षकांना थक्क केले. शीतलच्या जादूगिरीवर अमेरिकाही भाळली. जादूगिरीत भारताचे नाव आणखी मोठे करण्याचे तिचे स्वप्न आहे. परंतु पैसा आड येत आहे. यातच मूकबधिर असलेले तिचे पती तुषार किंमतकर यांची नोकरी गेल्याने हे कुटुंब अडचणीत आले आहे. जादूगार शीतलच्या नि:शब्द जादूचे मनोधैर्य वाढविण्यासाठी समाजाच्या मदतीच्या हाताची गरज आहे. हीच मदत तिला तिचे ध्येय गाठण्याची उभारी देऊ शकते.कुकडे ले-आऊट येथे राहणारी शीतल भुरे- किंमतकर जन्मत: मूकबधिर आहे. अशाही स्थितीत तिने बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले. बारावीत असताना मा. वा. गोखले यांनी शीतलला जादूचे प्रयोग शिकविण्याचे आव्हान स्वीकारले. वयाच्या २० व्या वर्षी शीतलने आपला पहिला जादूचा प्रयोग मंचावर सादर केला. पहिला प्रयोग यशस्वी झाल्याने तिचे मनोधैर्य वाढले. चिकाटी, परिश्रमाने जादूनगरीत तिने आपले स्थान बळकट केले. देशाची पहिली महिला जादूगार म्हणून तिच्याकडे पाहिले जाऊ लागले. दरम्यान, शीतलचे लग्न तुषार किंमतकरशी झाले. त्यांना कानाने जरी ऐकता येत नसेल तरीदेखील बोलता येत असल्याने तेच शीतलचा आवाज झाले. दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, केरळ यासह इतरही शहरात तिचे सतत दौरे होऊ लागले. जादूच्या प्रयोगांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तिचा आत्मविश्वास वाढला. मदतीला पती तुषार असल्याने ती हे शिवधनुष्य पेलू शकली. याच दरम्यान विविध देशात मूकबधिरांच्या कल्याणासाठी कार्य करणारी संस्था वर्ल्ड डीफ मॅजशिअन्स संस्थेने शीतलला आपले सदस्यत्व बहाल केले. यामुळे संपूर्ण जगात तिची ओळख निर्माण झाली.शीतलला जादूगिरीच्या क्षेत्रात भारताचे नाव आणखी उंच करायचे आहे. नवनवीन प्रयोगांना अंतिम स्वरूप द्यायचे आहे. परंतु पैशांशिवाय असे घडणे शक्य नाही. यातच तिच्या पतीची नोकरी गेल्याने हे कुटुंब आर्थिक अडचणीत आले आहे. त्यामुळे शीतलचे हे ध्येय पूर्ण करण्यासाठी समाजातून मदतीचे हात पुढे येणे गरजेचे आहे.
नि:शब्द जादूची जादूगार शीतल
By admin | Published: January 02, 2017 10:13 PM