पुण्यामध्ये आज कालवा फुटुन जनता वसाहतीपासून भिडे पुलापर्यंत पाणीच पाणी झाले होते. या दुर्घटनेमध्ये जिवितहानीचे वृत्त नसले तरीही कालवा फुटल्याचे समजताच पुणेकरांच्या काळजात धस् झाले. जवळपास सहा दशकांपूर्वी पानशेत धरण फुटल्याने पुण्याने विध्वंस पाहिला होता. या आठवणी ताज्या झाल्या.
12 जुलै 1961 ला सकाळी ७ वाजता ही दुर्घटना घडली होती. 1950 पर्यंत पुण्याला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा होत होता. यावेळी आणखी पाण्याची गरज भासू लागली. म्हणून खडकवासल्याच्या वरच्या बाजुला मातीचे धरण बांधायचा निर्णय झाला. 1958 ला नवीन धरण बांधायचे काम सुरु करण्यात आले. मुठेची उपनदी अंबा नदीवर पानशेत हे धरण बांधणे सुरु झाले. पहिल्या टप्प्यात 6 आणि नंतरच्या टप्प्यात 11 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असलेले धरण 1962 पर्यंत बांधून पूर्ण केले जाणार होते.
काम सुरु असताना काही ठिकाणी मातीवर दाब न दिला गेल्याने तेथील भाग कच्चा राहिला होता. तसेच धरणाचा दरवाजाही अर्धवट अवस्थेत होता. 1961 च्या जुनमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळू लागल्याने काम तशेच थांबविण्य़ात आले. मात्र, धरणक्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाणी साचू लागले. या पाण्याच्या दाब धरणावर येऊन 12 जुलैला धरण फुटले.
पुराचे पाणी जोरात खालच्याबाजुला असलेल्या पुणे शहरात घुसले. यामध्ये आताच्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठ आदी पेठांमध्ये पाणी घुसल्याने घरेच्या घरे वाहून गेली होती. या दुर्घटनेने पुण्याचा चेहरामोहराच बदलून टाकला होता.
पानशेत धरणाला भेग गेल्याची बातमी पसरताच पुण्यात सर्वत्र हाहाकार माजला होता. प्रशासन घाबरून जाऊ नये, असे पोकळ धीर देत होते. ११ जुलैच्या रात्री भारतीय जवानांनी धरणाच्या गळतीच्या भागात मातीची पोती लावून धरण थोपवून धरले होते. मात्र, पाण्याचा दाब वाढल्याने ते ही हतबल झाले. रात्री पुणेकर झोपेत असताना धरण फुटले असते तर प्रचंड जिवीतहानी झाली असती. सकाळी पानशेत घरण फुटले. त्यांनतर काही काळाने खडकवासला धरणही फुटल्याने पुण्यात सर्वत्र हाहाकार माजला होता.
आज मुठानदीवरील कालवा फुटल्याने या सहा दशकांपासून विस्मरणात गेलेल्या आठवणी ताज्या झाल्या. पुण्याचा विस्तार जसजसा वाढत गेला तसा धरणांवरील ताणही वाढताच आहे. दोन वर्षांपूर्वीही पानशेत धरणाला तडे गेले होते. मात्र, त्याची डागडुजी करण्यात आली होती. पानशेत धरणाबरोबरच पुण्यातील कालव्यांचीही दुर्दशा झाली आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने पुन्हा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.