पुणे :मुठा कालवा फुटून बाधित झालेल्या अद्याप तातडीने जाहीर करण्यात आलेली मदतही करण्यात नसल्याने संतापून या नागरिकांनी शनिवारी दुपारी रास्तारोको आंदोलन केले. कालवाग्रस्तांनी दूपारी दांडेकर पूलाजवळ रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत नाराजी दिसून आली. या अांदोलनात आबालवृद्ध सहभागी झाले होते. यावेळी कालवाग्रस्तांच्या हातात प्रशासनाचा निषेध असे फलक ही होते. या रास्ता रोकोमुळे दांडेकर पुलावर काहीकाळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
मुठा कालवा फुटून दांडेकर पूल भागातील सुमारे 98 घरे वाहून गेली. याशिवाय आजूबाजूच्या घरामधील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अंगावरच्या कपड्यांइतकाच संसार शिल्लक राहिला आहे. या घटनेनंतर अनेकांनी घटनास्थळी भेटी दिल्या. विशेषतः शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दुर्दैवाने अशी कोणतीही ठोस न मिळाल्याने नागरिकांची पुरती निराशा झाली आहे. सुरुवातीचे काही दिवस महापालिका, स्वयंसेवी संस्था तसेच नगरसेवकाकडून नाश्ता, पाणी जेवण दिले जात होते मात्र आता ते सुद्धा बंद झाले आहे. तर घरात काही करायचे झाल्यास ना भांडी आहेत ना गॅस, त्यामुळे नागरिकाची सहनशीलता संपली असून आता प्रशासनाला जागे करण्यासाठी नागरिकांनी आंदोलनाचे पाऊल उचलले.