मविआत ‘भाऊ’बंदकी! काँग्रेस, राष्ट्रवादीकडे ३६ ते ३८ जागा, ठाकरे गटाला १२? फॉर्म्युला मान्य होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 06:13 AM2023-05-22T06:13:25+5:302023-05-22T06:14:52+5:30

MVA Maharashtra Politics: जागावाटपाआधीच लहान कोण, मोठा कोण, यावरून वादाचे सूर. मविआमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यानंतर आता अन्य दोन मित्रपक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

MVA 'Brother' clashes! Even before the sharing of seats, there is a debate over who is the youngest and who is the eldest in politics Udhhav Thackerays shovsena, NCP and Congress | मविआत ‘भाऊ’बंदकी! काँग्रेस, राष्ट्रवादीकडे ३६ ते ३८ जागा, ठाकरे गटाला १२? फॉर्म्युला मान्य होणार का?

मविआत ‘भाऊ’बंदकी! काँग्रेस, राष्ट्रवादीकडे ३६ ते ३८ जागा, ठाकरे गटाला १२? फॉर्म्युला मान्य होणार का?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात करण्याआधीच आता महाविकास आघाडीत नवीन ‘भाऊ’बंदकी सुरू झाली आहे. लहान भाऊ कोण अन् मोठा भाऊ कोण यावरून वादाचे सूर निघू लागले आहेत. काँग्रेसने तर लहान-मोठे जाऊ द्या, राष्ट्रवादीचा जन्मच आमच्या उदरातून झाला असल्याचा टोला लगावला आहे. 

मविआमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यानंतर आता अन्य दोन मित्रपक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लहान-मोठ्याचा फैसला निवडणुकीत होईल. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या नावाने मते मागणारे खासदार सत्तेसाठी फुटले असले तरी आम शिवसैनिक व त्यांची संपूर्ण सहानुभूती, विश्वास हा उद्धव ठाकरेंवरच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते ॲड.अनिल परब यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

भाजपकडून चाचपणी
मविआचे जागावाटप आजच केले तर नाराज झालेल्या पक्षांचे इच्छुक उमेदवार भाजपच्या गळाला लागू शकतात अशी भीतीदेखील आहे. भाजपने असे नाराज कोण असू शकतील व त्यांना आपल्याकडे कसे ओढता येईल याची चाचपणी सुरू केली आहे. अशा नाराजांना लोकसभेची उमेदवारी देणे शक्य नसेल तर विधानसभेचे गाजर दाखवून भाजप जवळ करेल असे मानले जाते.

चर्चा आतापासूनच सुरू करण्यावर मतभेद! 
n महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा लोकसभा निवडणुकीला एक वर्ष आणि विधानसभा निवडणुकीला दीड वर्षे बाकी असताना करण्यावरून मविआत मतमतांतरे असल्याचे म्हटले जाते. 
n एक-दीड महिन्यातच जागावाटप ठरले तर भाजपला रणनीती आखणे सोपे जाईल. त्यापेक्षा नोव्हेंबरच्या आसपास फॉर्म्युला ठरवावा असाही एक मतप्रवाह आहे.

७५:२५ चा फॉर्म्युला?
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी व काँग्रेसने ३६ ते ३८ जागा लढवाव्यात आणि ठाकरे गटाने १२ ते १४ जागा लढवाव्यात असा प्रस्ताव काँग्रेस व राष्ट्रवादीकडून दिला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्याला ७५ ते ७८ टक्के जागा व ठाकरे गटाला २२ ते २५ टक्के जागा असे वाटप केले जाऊ शकते. अर्थात ठाकरे गटाला ते मान्य होणार नाही असे सध्याच्या त्यांच्या पवित्र्यावरून दिसते.


ठाकरेंची ती ताकद आहे?
शिवसेनेने २०१९ मध्ये १८ जागा जिंकल्या पण आज त्यांच्याकडे पाचच खासदार आहेत. आता त्यांना १८ ते २० जागा कशा द्यायच्या?, असा सवाल राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना केला.

महाविकास आघाडीत कोण मोठा भाऊ आहे? कोण लहान भाऊ आहे?, हे पाहण्यासाठी आता डीएनए टेस्ट करावी लागेल. अजित पवार काय म्हणतात किंवा कोण काय म्हणतो, याला जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अशा भूमिका घ्याव्या लागतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात आमचे १८ खासदार जिंकले होते. आमचा तो आकडा कायम राहीलच.  
    - खा.संजय राऊत, 
    शिवसेना (ठाकरे गट) नेते

२०१९नुसार जागा वाटप योग्य नाही. भाजपला कोणता पक्ष व कोणता उमेदवार पराभूत करू शकतो ते महत्त्वाचे आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला हा त्या आधारे ठरला पाहिजे. छोटा भाऊ, मोठा भाऊ हा विषय 
जाऊ द्या. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या उदरातून झाला आहे. 
    - अतुल लोंढे, 
    काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते


नाक
चुलत म्हणाला-
‘थोरला आहे’
सावत्र म्हणाला-
‘धाकटा आहे’
मावस म्हणाला-
‘एकटा आहे’
कर्नाटक म्हणालं-
‘मोळी सुटली तर 
प्रत्येक जण नकटा आहे’
    - रामदास फुटाणे

२०१९ मध्ये काय होती स्थिती? 
पक्ष    जागा     जागा    मिळाली     मतांची
    लढवल्या    जिंकल्या    मते    टक्केवारी 
भाजप     २५    २३    १४९१२१२३    २७.८४ 
शिवसेना    २३    १८    १२५८९०६४    २३.५ 
राष्ट्रवादी    १९    ०४    ८३८७३६३    १५.६६ 
काँग्रेस    २५    ०१    ८७९२२३७    १६.४१

Web Title: MVA 'Brother' clashes! Even before the sharing of seats, there is a debate over who is the youngest and who is the eldest in politics Udhhav Thackerays shovsena, NCP and Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.