मुंबई: गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीनं काँग्रेसवर कुरघोडी केली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या मदतीनं राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका केली. राष्ट्रवादीनं पाठीत खंजीर खुपसल्याचं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली. तर नाना पटोलेंनी स्वत: किती पक्ष बदलले, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केला.
काँग्रेस, राष्ट्रवादीमधील नाराजी समोर येत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. यावर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं. सगळ्याच नात्यांमध्ये अशा गोष्टी घडत असतात, असं सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडीचा संसार ५ वर्षे टिकणार का, असा प्रश्न एका पत्रकारानं विचारला. त्यावर तुम्ही कधीपासून आमच्या संसाराबद्दल डाऊट घेताय? तुम्हाला बोअर नाही झालं का? कुछ नया बोलो यार, असं मिश्किल उत्तर सुळेंनी दिलं.
काँग्रेस, राष्ट्रवादीमधील कुरबुरींबद्दल प्रश्न विचारणाऱ्या एका पत्रकाराला सुळेंनी तुमचं लग्न झालंय का, असा प्रतिप्रश्न केला. 'प्रेमाच्या नात्यांमध्ये भांडणं होतच असतात. त्यामुळेच तर नातं अधिक घट्ट होतं. आमचं जे काही आहे, ते घरातलं आहे. राष्ट्रवादीचा कोणता नेता जाहीरपणे काही बोलतो का?', असा सवाल सुळेंनी केला.
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आम्ही बाहेर बोलत नाही. काही जण बाहेर बोलतात. काही जण घरातच बोलतात, हे सांगताना सुप्रिया सुळेंनी एका पत्रकाराला तुमचं लग्न झालंय का, असा प्रश्न विचारत कौटुंबिक उदाहरण दिलं. 'तुमची मावशी बाहेर मनमोकळेपणानं बोलत असेल. पण तुमची आई, बायको बाहेर बोलत नसतील. पण मेहुणी बाहेर बोलत असेल. व्यक्तीनुसार स्वभाव बदलत असतात. पण मनमोकळेपणानं बोलत राहायला हवं,' असं सुळे म्हणाल्या.