जळकोट (जि. लातूर) : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सोयाबीनसह सर्व पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना जोपर्यंत मदत मिळणार नाही, तोपर्यंत राज्य सरकारला झोपू देणार नाही. वेळप्रसंगी आंदोलने करू अथवा झटका दाखवू असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे रविवारी दिला.
लातूर जिल्ह्यातील वांजरवाडा तसेच अन्य भागातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी फडणवीस यांनी केली. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, माजी आ. सुधाकर भालेराव, जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे आदींची उपस्थिती होती.
यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, मराठवाड्यात भीषण परिस्थिती असताना सरकारचा एकही प्रतिनिधी पाहणीसाठी आलेला नाही. सरकार झोपेचे सोंग घेत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांचीही मनमानी सुरू आहे. नुकसानीचा अर्ज करण्यासाठी कंपन्यांकडून पैसे मागितले जातात. या सरकारची विमा कंपन्यासोबत सेटिंगच आहे, असा आरोपही त्यांनी केला. आम्ही आमच्या काळात कोट्यवधींचा पीकविमा शेतकऱ्यांना दिला. सत्तेवर येण्यापूर्वी राज्य सरकार बांधावर जाऊन ५० हजारांच्या मदतीची मागणी करीत होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर त्याचा विसर त्यांना पडला आहे. उलट शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडून तसेच बँक कर्ज वसुलीचा तगादा लावून हैराण केले आहे, असाही आरोप फडणवीस यांनी केला.
ठाकरे सरकार घरात, विरोधी पक्ष जनतेच्या दारात...
मराठवाडा आणि विदर्भात पाहणी दौरा होत आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही ठाकरे सरकार घरात बसले आहे. विरोधी पक्ष मात्र जनतेचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी जनतेच्या दारात आले आहे. बळीराजाचा आम्ही विश्वासघात करीत नाही. विद्यमान सरकारने बळीराजाचा विश्वासघात केल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. डोळे झाकलेल्या सरकारचे डोळे उघडे केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, जळकोट तालुक्यातील नुकसानीचा आढावा माजी आ. सुधाकर भालेराव यांनी मांडला.