आमची ती तीन चाके, त्यांचे लगेच त्रिशूळ झाले; ठाकरेंचा शिंदे-फडणवीस-पवार सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 06:59 PM2023-07-09T18:59:10+5:302023-07-09T19:01:47+5:30
पोहरादेवीकडे मी पुन्हा मुख्यमंत्री होऊदे म्हणून आशिर्वाद नाही मागितला. मी राज्यातील या गद्दारांचे आणि राजकारणाची पातळी जी घसरत चालली आहे त्यांना थोपविण्याचा आशिर्वाद मागितला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पोहरादेवीच्या दर्शनाला गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ-वाशिमच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राठोड, भावना गवळी यांच्यासह मोदी-फडणवीसांवरही टीका केली. याचबरोबर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेलेल्या पवार गटावरही टीका केली. पोहरादेवीकडे मी पुन्हा मुख्यमंत्री होऊदे म्हणून आशिर्वाद नाही मागितला. मी राज्यातील या गद्दारांचे आणि राजकारणाची पातळी जी घसरत चालली आहे त्यांना थोपविण्याचा आशिर्वाद मागितला आहे. या राजकारण्यांमधील गद्दारी जाऊदे ही प्रार्थना केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
२०० रुपये हप्ते घेणाऱ्याला मंत्री कोणी केला, तेव्हा ते हप्ते घेत होते हे मला माहिती नव्हते. भाजपाने आमच्यावर टीका केली. पहिले निष्ठावंत आता कुठल्या सतरंजीखाली सापडतायत ते पहावे. भुजबळ आमच्याकडे होते, राष्ट्रवादीत गेले आता तिकडे गेले. आता पक्ष फोडायला सुरुवात झाले आहे. मतातून सरकार येत होते. आता खोक्यातून येत आहे. माझा कारभार वाईट होता, तर जनता मला घरी बसवेल. परंतू तुम्ही बाळासाहेबांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून बाजुला केले. ते जाऊद्या, जर तुमचे सरकार १६५ आमदारांचे होते, तर राष्ट्रवादीच्या ४० आमदारांना का फोडले असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
पंतप्रधानांनी राष्ट्रवादीने ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. चार दिवसांनी एक गट आम्हीच राष्ट्रवादी म्हणत त्यांच्यासोबत गेला आहे. आता याच राष्ट्रवादींसोबत मोदींचा फोटो येणार आहे. हे भोपाळमध्ये बोलतात, पण मणिपूरवर एक शब्द जरी बोलला का? असा आरोप ठाकरे यांनी केला. आमचे सरकार होते ते तीन चाकांचे सरकार होते. यांचे लगेच त्रिशुळ झाले. एवढे केंद्रात सरकार, महाराष्ट्रात सरकार मग शेतकऱ्यांचे विजबील का माफ करत नाहीत, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.