मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 03:17 PM2024-04-27T15:17:53+5:302024-04-27T15:18:26+5:30
Sanjog Waghere patil Vs Ajit pawar: आमदार अण्णा बनसोडे यांच्या जेष्ठ कन्येच्या विवाह सोहळा शुक्रवारी सायंकाळी पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळचे ठाकरेंचे लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे पाटील आले होते.
लोकसभा निवडणुकीने काका-पुतणे, सून, वहिणी, नणंद असे काही नाते पाहिलेले नाही. असाच प्रकार समर्थकांचाही झाला आहे. कधी काळी कट्टर समर्थक असलेले राजकीय भुमिकेमुळे एकमेकांना पाहूनही घेत नाहीएत. एकमेकांवर टीका, चिखलफेक, ब्लॅकमेलिंग सुरु आहे. महाराष्ट्रात राजकारणाची अशी खिचडी बनली आहे की काही सांगू नका. अशातच काल अजित पवारांचा कट्टर समर्थक असलेला नेता ठाकरे गटात जात लोकसभेचा उमेदवार बनला, त्याची आणि अजित पवारांची एका लग्नसमारंभात गाठभेट झाली. तिथे घडलेला किस्सा पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मावळमध्ये चर्चिला जात आहे.
झाले असे, आमदार अण्णा बनसोडे यांच्या जेष्ठ कन्येच्या विवाह सोहळा शुक्रवारी सायंकाळी पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळचे ठाकरेंचे लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे पाटील आले होते. अजित पवार आणि वाघेरे एकाचवेळी व्यासपीठावर आले आणि पुढे जे घडले त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अजित पवारांना पाहून वाघेरे त्यांच्या पाया पडले. हे पवारांना अनपेक्षित होते. वाघेरे पाटील हे काही महिन्यांपर्यंत अजितदादांचे कट्टर समर्थक होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ठाकरे गटात उडी घेत मावळचे तिकीट मिळविले होते. ज्या उमेदवाराकडून अजित पवारांचा मुलगा पराभूत झाला त्याचाच प्रचार आता अजित पवार करत आहेत. या उमेदवाराविरोधात वाघेरे लढत आहेत.
अजित पवार व्यासपीठावर वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी गेले होते. तेव्हा ते माईकवरून काहीतरी वाचून दाखवत होते. वाघेरे तेव्हा त्यांच्या पाया पडले. अजित पवारांनी हास्य केले. पुढे दोघेही बाजुबाजुच्या टेबलवर पंगतीला बसले. परंतु अजित पवारांनी वाघेरेंकडे पाहिलेही नाही. वाघेरे मात्र वारंवार अजित पवारांकडे पाहत होते. अजित पवार इतरांशी चर्चा करण्यात व्यस्त होते.