मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला आता होळी, धुळवडीनंतरच ठरेल, असे चित्र आहे. मुंबईत शनिवारी यासंदर्भात एकही बैठक झाली नाही. एकाचवेळी सर्व ४८ जागांचे वाटप करण्याऐवजी निवडणुकीच्या टप्प्यानुसार ते करायचे, असा पर्याय आता पुढे आला असून, त्याबाबत नेते लवकरच निर्णय घेणार आहेत.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांमध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. या सर्व जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढणार आहे. त्यामुळे फॉर्म्युला एक-दोन दिवसांत ठरला नाही तरी फरक पडत नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना अकोला व इतर काही जागा द्यायच्या असतील तर महाविकास आघाडीला लवकर निर्णय करावा लागेल. कारण, अकोल्यासह आठ जागांची निवडणूक २६ एप्रिलला होणार आहे.
आंबेडकर यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करण्याची आमची भूमिका असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. काँग्रेसकडून त्यांच्या कोट्यातील दोन आणि शिवसेना व राष्ट्रवादीकडून (शरद पवार) एकेक जागा आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ऑफर केल्या जातील, अशी माहिती आहे.
आता सांगली, भिवंडी आणि मुंबईतील जागावाटप अडलेले आहे. सांगलीची जागा काँग्रेस व शिवसेनेलाही हवी आहे. भिवंडीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी दावेदार आहेत. सूत्रांनी सांगितले की, मुंबईत काँग्रेसला एकच जागा मिळेल. काँग्रेसने सध्या भाजपकडे असलेली उत्तर-पूर्व मुंबईची जागा लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे.