राज्यातील महत्वाच्या मतदारसंघापैकी एक असलेल्या माढ्यातून मोठी बातमी येत आहे. शरद पवार यांनी भाजपवर पलटविलेली बाजी, पुन्हा महायुतीच्या पथ्यावर पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मविआला धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील इच्छुक उमेदवाराने आज मनोज जरांगे यांनी बोलविलेल्या बैठकीत मराठा समाजाकडून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभेसाठी आज इच्छुकांना बोलविण्यात आले होते. महाविकास आघाडीकडून इच्छुक असणाऱ्या मीनल साठे या देखील या बैठकीला उपस्थित होत्या. त्यांनी माढा विधानसभा मतदारसंघासाठी सकल मराठा समाजाकडून उमेदवारी मागितल्याने मविआच्या गोटात खळबळ उडाली आहे.
मीनल साठे या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार धनाजी साठे यांच्या सून, तर माढ्याच्या माजी नगराध्यक्ष आहेत. माढ्यामध्ये कोण लढणार यावरून शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात गोंधळाचे वातावरण आहे. यातच मीनल साठे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचीही भेट घेतली होती. हा मतदारसंघ काँग्रेसला द्यावा अशी मागणी त्यांनी पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठांकडेही केली होती.
मविआकडून काही हालचाली होत नसल्याचे पाहून साठे यांनी दुसरीकडे चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. यातून साठे यांनी आज मराठा समाजाकडे उमेदवारीची मागणी केल्याने मविआमध्ये खळबळ तर महायुतीत आनंदाचे वातावरण आहे. साठे यांना मराठा समाजाची उमेदवारी मिळाली तर मविआच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे. तसेच शरद पवारांनी माढ्यासाठी भाजपच्या मोहऱ्याला फोडल्याच्या खेळीवरही पाणी फेरले जाणार आहे.