विधानसभेत मविआला बहुमत मिळणार, हा पक्ष मोठा भाऊ ठरणार, काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेत दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:26 PM2024-08-28T12:26:27+5:302024-08-28T12:47:07+5:30
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीपूर्वी जनमताचा कल जाणून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळे सर्व्हेही केले जात आहेत. अशाच काँग्रेसने केलेल्या एका सर्व्हेमधून राज्यात सत्तापरिवर्तन होऊन महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा दावा करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. तसेच राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष, सत्ताधारी महायुती आणि मुख्य विरोधक असलेल्या महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. तसेच या पक्षांकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी जनमताचा कल जाणून घेण्यासाठी वेगवेगळे सर्व्हेही केले जात आहेत. अशाच काँग्रेसने केलेल्या एका सर्व्हेमधून राज्यात सत्तापरिवर्तन होऊन महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा दावा करण्यात आला आहे.
काँग्रेसने केलेल्या या अंतर्गत सर्व्हेमधील आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार असून, काँग्रेसला ८० ते ८५ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ५५ ते ६० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला ३० ते ३५ जागा मिळतील, असेही या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. या सर्व्हेतील आकडेवारीवर नजर टाकल्यास महाविकास आघाडीला १६५ ते १८० जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीला मोठा फटका बसेल, अशी शक्यता या सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. या सर्व्हेतील आकडेवारीनुसार महायुतीमध्ये भाजपाला ६० ते ६२ जागा, शिवसेना शिंदे गटाला ३० ते ३२ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ८ ते ९ जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. या आकडेवारीची बेरीज केल्यास महायुतीला विधानसभा निवडणुकीच एकत्रितरीत्या ९८ ते १०३ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला मोठा धक्का दिला होता. महाविकास आघाडीने राज्यातील ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळवला होता. तर महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले होते.