राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्यांतर्गत वने व वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावांमध्ये ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन, जन-वन विकास साधण्यासाठी शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरू केली आहे.
गावातील संसाधनांची उत्पादकता आणि पर्यायी रोजगार संधी वाढवून वनावरील अवलंबित्व कमी केल्यास मानव व वन्यप्राणी संघर्ष कमी करून सहजीवन प्रस्थापित करणे या योजनेचा उद्देश आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील दीडशे गावांचा समावेश योजनेत करण्यात आला आहे. ताडोबा अंधारी प्रकल्पातील बफर झोनमधील ५० गावे या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करणे, पर्यायी व्यवस्था निर्माण करणे, गावकऱ्यांच्या सहभागातून वन व वन्यजीवांचे संरक्षण करणे. व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे. हे या योजनेचे उद्देश आहेत. ही योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समिती, तसेच ग्राम परिस्थिती समिती स्थापन करण्याचे नियोजन आहे. यासाठी ग्रामसभांनी ठराव घेऊन मंजुरी देणे आवश्यक आहे.