वाढती अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशकांचा वारेमाप वापर शेती क्षेत्रात सुरू आहे. यामुळे शेतीमध्ये रासायनिक खतांचा असंतुलित वापर वाढल्याने जमिनीतील जैविक घटकांचा विनाश होऊन त्या मृतवत होत चालल्या आहेत. तसेच तणनाशके-कीटकनाशकांच्या अतिवापरामुळेही जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. यापुढे ही विषयुक्त शेती टाळण्यासाठी शासनाने विषमुक्त शेती योजना आणलेली आहे.
शासनाने आणलेली ही योजना डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन या नावाने ओळखली जाते. सुरुवातीला या योजनेचे कार्यक्षेत्र हे फक्त विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत. याद्वारे बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेद्वारे मृद नमुना तपासणी, जैविक कुंपण, चर किंवा शेताच्या कडेला बांध घालणे, सेंद्रिय बियाणे संकलन, जमिनीत सूक्ष्म जीवजंतूंचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आदींसाठी अनुदान दिले जाते.