राज्य सरकार तसेच केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांचा अवलंब केला जातो. शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्साह येऊन त्यांनी आणखी भरीव कामगिरी करावी यासाठी विविध पुरस्कारही शासनातर्फे दिले जातात.
महाराष्ट्र शासनाने फलोत्पादनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांसह, विविध संशोधन संस्था, बागायतदार संस्था आदींना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचे फलोत्पादन क्षेत्रात आणखी भरीव योगदान वाढावे याकरिता त्यांना उद्यानपंडित पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राज्यात फळबागांचे क्षेत्र वाढून राज्यातील शेतकरी सधन व्हावे याकरिता शासनाने हा पुरस्कार सुरू केलेला आहे.
या पुरस्कारासाठी निवड झालेले शेतकरी, संशोधन संस्था तसेच बागायतदार संस्थांना २५ हजार रुपये रोख रक्कम किवा धनादेश यासह प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. राज्यात फलोत्पादनात अनेक शेतकरी तसेच संस्थांनी विशेष योगदान दिलेले आहे. त्यांना शासनाकडून उद्यान पंडित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.