मुलींचा घटता जन्मदर आणि मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, या दोन्ही गंभीर बाबींवर तोडगा म्हणून महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण विभागातर्फे २७ जून २०१८ रोजी कन्या वन समृद्धी योजना आणलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने आणलेली ही योजना महिला सशक्तीकरण व वृक्षारोपण या दोन्हींनाही बळकटी आणणारी आहे. कन्या वनसमृद्धी योजनेंतर्गत शासन ज्या घरात मुलीचा जन्म झालेला आहे, त्या शेतकरी कुटुंबाला मोफत दहा झाडांची रोपे देण्यात येतात. विविध प्रकारच्या फळझाडांची ही रोपटी असून, यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात चांगला फायदा होणार आहे. या योजनेचा लाभ एका कुटुंबात दोन मुलींपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आलेला आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करावी लागते. यानंतर वन विभागाकडे झाडांची रोपटी मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो. या झाडांपासून मिळणारे उत्पन्न हे सदर शेतकरी कुटुंबियांनी मुलीच्या संगोपनासाठी, तसेच तिचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वापरण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे.