रेशीम शेतीचे फायदे, वैशिष्ट्ये व तंत्रज्ञान गावागावात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने राज्यभरात १७ ते २९ डिसेंबर २०१८ दरम्यान महारेशीम जनजागृती अभियान राबवायला सुरुवात केली आहे.
रेशीम उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. राज्यातील हवामान या उद्योगासाठी पुरक आहे. याद्वारे ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिक स्तर उंचावणे, संपूर्ण राज्यात एकाच वेळी रेशीम शेतीचा प्रचार व प्रसिद्धी करणे, रेशीम शेतीचे तंत्रज्ञान गावागावात पोहोचविणे, रेशीम शेतीकरिता शासनाच्या विविध योजना आहेत, जसे मनरेगा, जिल्हा वार्षिक योजना आदी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता, त्यासाठी लागणारी कागदपत्रे याबाबत समजावून सांगणे, हा या महारेशीम जनजागृती अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
राज्यभरात हे अभियान लवकरच राबविण्यात येत असल्याने लाभार्थ्यांना जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुती रोपे तयार करण्यास कालावधी मिळणार आहे. गटशेतीद्वारे रेशीम शेती वाढविणे हासुद्धा या महारेशीम जनजागृती अभियानाचा उद्देश आहे.