केळी पिकावर पडणारा सिगाटोका हा बुरशी प्रकारातील रोग आहे. हा रोग एका विशिष्ट प्रकारच्या बुरशीमुळे होतो. अतिशय दमट हवामानामध्ये रोगट पानांवरील दवबिंदूंमध्ये बीजाणू मिसळल्यानंतर हे दवबिंदू निरोगी पानांवर पडल्यानंतर हा रोग इतर पानांवर पसरतो.
उष्ण व दमट हवामान, सतत पडणारा रिमझिम पाऊस, दीर्घकाळ ढगाळ वातावरण, २३ ते २५ डिग्री तापमान या गोष्टी रोगासाठी अनुकूल आहेत. या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. महाराष्ट्रात मुख्यत: पिवळा सिगाटोका हा रोग आढळतो. हा करपा रोग जर केळी पिकावर पडत असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुकास्तरावर अनुदानित रकमेत कीटकनाशके आणि बुरशीनाशके मिळण्याची योजना शासनाने सुरू केलेली आहे.
ही योजना धुळे, नंदुबार, जळगाव आदी जिल्ह्यांसाठीच आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वत:ची शेतजमीन असावी लागते. शेतीत केळीचे पीक असावे लागते. ७/१२ उतारा नमुना ८ अ ही कागदपत्रे लागतात. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हानिहाय जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. याद्वारे रोगाच्या नियंत्रणावर मार्गदर्शन केले जाते.