गारपीट, अवेळी पावसाचा तडाखा, वेगाचा वारा, तापमानाचा फटका आदी नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या फळबागांना मोठा फटका बसतो. या धोक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादकतेत घट येऊन आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामानाच्या धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी व शेतकऱ्यांना फळ पीक नुकसानभरपाई मिळावी याकरिता शासनाची पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना ही आधारवड आहे.
या योजनेत २०१७-१८ या वर्षात संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू, द्राक्ष, लिंबू, केळी या पिकांचा समावेश होता. शासनाने जिल्हानिहाय वेगवेगळ्या फळ पिकांची निश्चिती करून सदर योजना लागू केली आहे. यावर्षी आंबा या पिकालाही १ जानेवारी २०१८ पासून संरक्षण देण्यात आले आहे; मात्र आंब्याचे क्षेत्र कोकणापुरते मर्यादित ठेवण्यात आले होते.
यावर्षी प्रथमच कोकणाबाहेर विदर्भातील काही जिल्ह्यांमधील मंडळांचा यावर्षी प्रथमच समावेश करण्यात आला असून, १ जानेवारी २०१९ पासून आंबा फळ पिकाला संरक्षण प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांनी यासाठी बँकेत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक करण्यात आलेली आहे.