राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला. या अंतर्गत शेतकरी, उत्पादक संघ, सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना अवजारे, उपकरणे व संयंत्रे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दिवसेंदिवस शेती कामांमध्ये मजुरांची कमी होणारी संख्या, वाढती मजुरी यामुळे पिकांचा उत्पादन खर्च वाढतो.
यामुळे फलोत्पादन क्षेत्रामध्येही अवजारे आणि यंत्रांचा वापर महत्त्वाचा आहे. शेतकरी, उत्पादक संघ व सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना अवजारे, उपकरणे व संयंत्रे अनुदानावर उपलब्ध करून देण्यासाठी फलोत्पादन यांत्रिकीकरण हा घटक राबविण्यात येत आहे. शेतीची कामे वेळेवर करणे, शेतीकामाचा वेळ वाचविणे व मशागतीचा खर्च कमी करणे, शेतीच्या यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, फलोत्पादन पिकांची उत्पादकता व गुणवत्ता यामध्ये वाढ करणे आदी या योजनेची उद्दिष्टे आहेत.
लाभार्थींच्या नावे शेतजमीन असावी, त्यांच्या नावे ७/१२ व ८-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. ७/१२ उताऱ्यावर फलोत्पादन पिकांची/भाजीपाला पिकांची/ मसाला पिकांची/ पुष्पोत्पादन पीक लागवडीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.