राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील विकसित आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी राज्याच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौरा ही योजना राबविली जाते. ४० ते ५० शेतकऱ्यांना एका अभ्यास दौऱ्यात सहभागी करून घेतले जाते.
हॉलंड, जर्मनी, फ्रान्स, स्वीत्झर्लंड, आस्ट्रिया, स्पेन, व्हिएतनाम, मलेशिया, इस्त्रायल, थायलंड, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया इ. देशांमध्ये हे दौरे असतात. शेतकऱ्यांना यासाठी ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल एवढे अनुदान मिळते. या योजनेस पात्र ठरण्यासाठी शेतकरी प्रयोगशील असावा.
शेतकऱ्यांचे वय २१ ते ६२ यादरम्यान असावे. शेतकरी आत्मा व इतर कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या गटांचा सदस्य असावा. त्याने गटशेती, समूहशेतीद्वारे शेतीचा विकास केलेला असावा. कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबाबत पुरस्कारप्राप्त शेतकरी तसेच अनुसूचित जाती व जमातीमधील शेतकरी, महिला शेतकरी, कृृषी विद्यापीठाचे पदवीधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येते. तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडे या योजनेची माहिती मिळते.