राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून सहकारी व खासगी दूध संस्था अत्यंत कमी दराने दूध खरेदी करतात, असा आरोप होत होता. यावर तोडगा म्हणून शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये वाढीव अनुदान देण्याची योजना अंमलात आणलेली आहे.
खासगी तसेच सहकारी दूध संस्थांच्या माध्यमातून हे अनुदान देण्यात येत आहे. दुधातील फॅटच्या प्रमाणानुसार दुधाचे दर कमी जास्त ठरविलेले असले तरी शासनाकडून दूध संस्थांना शेतकऱ्यांचे दूध वाढीव दरानुसार खरेदी करण्याचे बंधनकारक केले आहे. दूध संस्थांना शासनाकडून नंतर हे अनुदान प्राप्त होते. प्रतिदिन १० लिटर दुधाची हाताळणी करणाऱ्या संस्था या अनुदानास पात्र आहेत.
संस्थांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अनुदान योजनेचा लाभ घेतलला नाही तरी शेतकऱ्यांना वाढीव भाव द्यावाच लागणार आहे. प्रक्रिया केलेल्या पिशवीबंद दुधाला हे अनुदान मिळत नाही. दूध संस्थेला दूध खरेदी दराची रक्कम उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आॅनलाईन पद्धतीने जमा करणे बंधनकारक आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे.