फळपिके, भाजीपाला, फुलपिके, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती या पिकांववर कीड पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन मानसिक खच्चीकरण होते. हे सर्व कीड रोग नियंत्रणासाठी शासनाने फलोत्पादन पीक संरक्षण योजना अमलात आणलेली आहे. या योजनेद्वारे रोग नियंत्रणासाठी लागणारे कीटकनाशके, औषधींसाठी ५० टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
कीडरोग नियंत्रणासाठी लागणारी कीटकनाशके, बुरशीनाशके यांची खरेदी फलोत्पादन संचालकांनी मंजूर केलेल्या यादीप्रमाणे शेतकऱ्यांना करावी लागते. रासायनिक व जैविक कीटकनाशके खरेदी करण्याची मुभा शेतकऱ्यांना राहील. या योजनेसाठी सर्वच प्रवर्गातील शेतकरी पात्र राहतील. यात अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे शासनाचे आदेश आहेत. यासाठी शेतकऱ्यांना ७/१२ व ८ अ चा दाखला, आधार ओळखपत्र, आधार लिंक केलेले बँकेचे खातेक्रमांक, लाभार्थी अनुसूचित जाती, जमाती या प्रवर्गातील असेल, तर वैध जात प्रमाणपत्राची प्रत ही पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.