राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शासनातर्फे २०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षांकरिता वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने यावर उपाययोजना करण्यासाठी वैयक्तिक शेततळे योजना सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे दिले जाते. शेततळ्यांसाठी आॅनलाईन अर्ज करावा लागतो. शासनाकडून या शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी कृषी विभागाच्या हॉर्टनेट पोर्टलवर आॅनलाइन अर्ज मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर या अर्जांची सोडत काढण्यात येऊन लाभार्थ्यांची निवड केली जाईल.
निवड करण्यात आलेल्या अर्जांना पूर्वसंमती दिल्यानंतरच अनुदान देण्याच्या सूचना आहेत. बहुतांश वेळा शेतकरी कृषी विभागाची पूर्वसंमती न घेताच शेततळे तयार करतात. त्यानंतर अनुदान मागणीसाठी प्रस्ताव सादर करतात. अशा प्रस्तावांना मंजुरी मिळणार नाही. पूर्वसंमतीनंतरच अनुदान मिळणार आहे.