शेती व्यवयासात महिलांचे सर्वात मोठे योगदान असते. शेतीतील कोणतेही काम महिलांशिवाय पूर्ण होत नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला शेतीत कष्ट घेत असतात, तसेच अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी स्वकर्तृत्वाने शेती क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.
शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग व योगदान लक्षात घेऊन, तसेच त्यांच्या कार्याचा यशोचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी याकरिता महाराष्ट्र शासनाने जिजामाता कृषिभूषण पुरस्कार योजना आणलेली आहे. ही योजना शासनाने सन १९९५ मध्ये सुरू केली. २०१४ अखेरपर्यंत राज्यातील ९५ महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
राज्यातून दरवर्षी पाच शेतकरी महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. प्रत्येकी ५० हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह, तसेच पतीसह सत्कार, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार निवडीसाठी कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीमार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून निवड करण्यात येते. निवड झालेल्या महिलांना कार्यक्रमादरम्यान पुरस्कार प्रदान करण्यात येतो.