शेतीमध्ये रासायनिक खते व औषधींच्या वापरामुळे जमिनीची अपरिमित हानी होत आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात होत असून, विविध आजारांना आमंत्रण दिले जात आहे. भविष्यात ही हानी रोखण्यासाठी, तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शासनाने सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अवास्तव वापर थांबवून सेंद्रिय शेतीकडे त्यांचा कल वाढावा यासाठी शासनाने २००९ सालापासून सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्काराला सुरुवात केली आहे.
राज्यात सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना, तसेच सामाजिक संस्थांना शासनामार्फत सेंद्रिय शेती कृृषिभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यासाठी पन्नास हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र, तसेच सपत्नीक सत्कार, असे या पुरस्काराचे स्वरूप असून, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांनी यासाठी प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. राज्यातून एक संस्था, तसेच प्रत्येक विभागातून एक शेतकरी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.