अन्नधान्य व इतर पिकांच्या उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर होत असून, पर्यावरणाचा -हास होत आहे. मानव व पशूपक्षी यांच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. हा -हास रोखण्यासाठी, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने जैविक शेतीकडे वळावेत याकरिता शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजना आणलेली आहे.
याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने, वाढविणे, तसेच याद्वारे उत्पादित शेतमालाला देशासह विदेशातील बाजारपेठाही उपलब्ध करण्याकरिता शासनाने ही योजना आणलेली आहे. योजनेत बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा उद्देश आहे. योजनेद्वारे मृद नमुना तपासणी, जैविक कुंपण, चर किंवा शेताच्या कडेला बांध बांधणे, सेंद्रिय बियाणे संकलन, सेंद्रिय पद्धतीने रोप निर्मिती करणे, कंपोस्ट पद्धतीचा वापर करून खतनिर्मिती करणे, जमिनीमध्ये सूक्ष्म जीवजंतूंचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना करणे, पीक संरक्षणासाठी जैविक वनस्पतीजन्य अर्क तयार करणे, तरल कीडरोधक तयार करणे, आदींसाठी अनुदान मिळते. सुरुवातीला ही योजना विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबविली जाईल.