कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गांडूळ खतनिर्मिती, सीपीपी कल्चर युनिट, सेंद्रिय शेतीशाळा, अभ्यास दौरे, समूह संघटनांसाठी अर्थसाह्य यासारख्या विविध योजना राबविल्या जातात.
गांडूळ खत उत्पादन व वापरांतर्गत गांडूळ खत उत्पादन युनिट स्थापन करणे, बायोडायनामिक कंपोस्ट युनिट स्थापन करणे, सीपीपी कल्चर युनिट स्थापन करणे, निंबोळी पावडर व अर्क तयार करण्यासाठी निम पल्वरायझर/ ग्राइंडरचा पुरवठा करणे आदी उपक्रम राबविण्यात येतात. यातील गांडूळ खत उत्पादन युनिटसाठी एकूण खर्चाच्या २५ टक्के दराने जास्तीत जास्त २ हजार ५०० रुपये याप्रमाणे अनुदान देय आहे.
बायोडायनामिक कंपोस्ट तयार करण्यासाठी सीपीपी कल्चर लागते, तसेच सीपीपी हे उत्तम जमीन सुधारक आहे, त्यामुळे बियाण्याची उगवण लवकर होते. जमिनीचा पोत सुधारतो. पिकात कीड व रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते. सीपीपी कल्चर युनिट उभारणीसाठी २५० रुपये प्रति युनिट अनुदान देय राहील.