ग्रामीण भागात कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी, तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा याकरिता २०११-१२ पासून केंद्र शासनातर्फे राज्यात परसबाग कुक्कुटपालन योजना राबविली जाते.
या योजनेंतर्गत एकदिवसीय पिले खरेदी, त्यांचे संगोपन व आदी बाबींकरिता लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदान दिले जाते. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब दारिद्र्यरेषेखाली असावे. यात अनुसूचित जाती १६.२ टक्के, अनुसूचित जमाती ८ टक्के, अपंग ३ टक्के व महिला ३० टक्के असे प्रमाण असणे आवश्यक आहे.
योजनेंतर्गत प्रति लाभार्थ्याला चार आठवडे वयाच्या ४५ कुक्कुटपक्ष्यांचा पुरवठा केला जातो. त्यांचा खरेदी खर्च, चार आठवडे वयापर्यंतचा संगोपनाचा खर्च अनुदान रूपाने दिला जातो. शासनाने कुक्कुटपिलांची किंमत व त्यांचा चार आठवडे वयापर्यंतचा संगोपनाचा खर्च याची किंमत निर्धारित केलेली आहे. मात्र, सद्य:स्थितीत हा खर्च कमी पडत असल्याने शासनाने एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम या जिल्हास्तरीय योजनेच्या निधीतून उर्वरित अनुदान देण्यास मान्यता दिलेली आहे.