शेतकरी उत्पादक कंपनीला आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने उत्पादक कंपनीतील समभागधारक (शेअर होल्डर) शेतकऱ्यांना त्यांच्या समभाग भांडवलाइतक्याच रकमेचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी समभाग निधी योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेची अंमलबजावणी केंद्रीय छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघामार्फत करण्यात येत आहे. शेतकरी उत्पादन कंपनीची व्यवहार्यता वाढवून ती टिकवून ठेवण्याबरोबरच उत्पादक कंपनीची पत योग्यता वाढविणे आणि सभासदांच्या समभाग रकमेत वाढ करून त्याची कंपनीतील सहभागातून मालकी वाढविणे या प्राथमिक उद्दिष्टपूर्तीसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी ही नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. शेतकरी भागधारकांची संख्या ५० पेक्षा कमी नसावी. सर्व सभासदांकडून भागभांडवल गोळा केलेले असावे. उत्पादक कंपनीच्या उपविधी अन्वये या कंपनीमधील वैयक्तिक भरणा केलेले समभाग ३० लाखांपेक्षा जास्त नसावा, तसेच उत्पादक कंपनीमधील एकूण समभागाच्या किमान ३३ टक्के समभागधारक हे अल्प शेतकरी असावेत.