कृषी पद्धतीत रासायनिक खतांचा तसेच पाण्याचा अनिर्बंध वापर होत आहे. यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले असून, त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मृद आरोग्य अबाधित राखण्यासाठी शासनाने मृद आरोग्यपत्रिका अभियानांतर्गत योजना आणली आहे.
मृद तपासणीवर आधारित रासायनिक खतांच्या संतुलित तसेच परिणामकारक वापरास चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या सहयोगाने ही योजना २०१५-१६ या वर्षापासून राबविणे सुरू केले आहे. योजनेनुसार वहितीखालील क्षेत्रामधून जिरायती क्षेत्रासाठी १० हेक्टर क्षेत्रास एक मृद नमुना, बागायत क्षेत्रासाठी अडीच हेक्टर क्षेत्रास एक नमुना घेऊन त्याची तपासणी करण्यात येते.
या तपासणीत शेतकऱ्यांच्या जमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता याबाबत माहिती या आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून मिळते. कृषी विभागाचे कर्मचारी तसेच गावातील कृषीमित्र शेतकऱ्यांच्या शेतीतील मृद नमुने घेऊन ते विश्लेषणासाठी पाठवितात. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीत काय कमी आहे, याची माहिती मिळते.